मुंबईतील कर्मचाऱ्यांना 8 मे पासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरात "नो एंट्री" - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 May 2020

मुंबईतील कर्मचाऱ्यांना 8 मे पासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरात "नो एंट्री"


मुंबई - कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेशच या दोन्ही पालिकांच्या आयुक्तांनी काढले आहेत. येत्या ८ तारखेपासून हे आदेश लागू करण्यात येणार आहेत. तसेच या दोन्ही शहरांच्या हद्दीत कुणीही प्रवेश करणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी पोलिसांना दिल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील करोनाबाधितांची संख्या २१३वर पोहोचली आहे. सध्या करोनावर १४२ जण उपचार घेत आहेत. यातील ६० बाधित हे मुंबईत दररोज प्रवास करणारे आहेत. त्यामुळे मुंबईला प्रवास करणाऱ्यांकडूनही करोनाचा फैलाव होत असल्याने कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी हे आदेश जारी केले आहेत. कल्याण-डोंबिवली, टिटवाळ्यातून दररोज सुमारे अडीच हजार कर्मचारी मुंबईला कामाला जातात. यात सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांची त्यांच्या त्यांच्या अस्थापनांनी कामाच्या ठिकाणीच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. येत्या ८ मेपासून ही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच पालिका आयुक्तांनी एक फॉर्म जारी केला असून मुंबईत रोज कामावर जाणाऱ्यांनी त्यात त्यांची माहिती भरायची आहे.

कल्याणपेक्षाही डोंबिवलीत करोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहे. डोंबिवलीत एका लग्नाला एक करोनाबाधित रुग्ण गेला होता. त्याच्या संपर्कात आल्याने लग्नातील वऱ्हाडींना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत करोनाची झपाट्याने लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने करोना रोखण्यासाठी अनेक उपाय योजना सुरू केलेल्या असतानाच आता कल्याण-डोंबिवलीत बाहेरच्यांना आणि कल्याण-डोंबिवलीतून बाहेर गेलेल्यांना प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असेच आदेश उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही काढले असून मुंबईला कामावर जाणाऱ्यांना शहरात प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Post Bottom Ad