Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बाळासाहेबांचा थोडा तरी मान ठेवा ! - फडणवीस


मुंबई: 'ही कोणती भूमिका आहे? मंदिर नाही, पण मदिरा सुरू! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा. बदला, पण इतकेही बदलू नका', अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले. 'हाथरसचा निषेध प्रत्येकाने केलाच पाहिजे. पण महाराष्ट्रातील किती भगिनींबद्दल संवेदना दाखविली? कोविड सेंटरमध्ये बलात्कार आणि विनयभंग या नित्याच्याच घटना झाल्या आहेत. किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम (SOP) तयार करणार ते तरी सांगा', असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.

मराठा आरक्षणावर आज राज्यभरात संताप आहे. पण राज्य सरकारकडून नुसता वेळकाढूपणा सुरू आहे. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी पुन्हा भाजपवर आरोप केले जाताहेत. या सरकारकडे एकच काम आहे ते म्हणजे कुणी काही आरोप केला की महाराष्ट्रद्वेष म्हणायचे आणि भाजपवर टीका करून मोकळे व्हायचे. सरकारचे काम प्रश्न सोडविण्याचे असते याचे भान राज्यकर्त्यांना राहिलेले नाही, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी सोडले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की, कायदेशीर मार्गाने आंदोलन करा. कायदा हातात घेऊ नका. महाराष्ट्र पेटलेला मी अनुभवला आहे, असे नमूद करत फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

करोनाच्या काळात माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत तरीही राज्यकर्त्यांना झोप कशी येते?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला. सामान्य माणूस आज आक्रोशित आहे. डोळे मिटून दूध पिले, तरी जनतेला हा भ्रष्टाचार दिसतो आहे. खरं तर करोनाच्या काळात राजकारण करायचे नाही, असे ठरवले होते पण आता भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र नाही. १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची बदनामी करणारी तर तुमची कृती आहे, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी सोडले. शेती विषयक विधेयक पारित होताच महाराष्ट्राने तातडीने अंमलबजावणीसाठी आदेश काढले पण मॅडम नाराज होताच नंतर त्याला स्थगिती दिली, अशी तोफ डागताना आता आपण बांधावर जाऊन, बळीराजाला भेटून वास्तव सांगू असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

कोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही. विदर्भात पूर आला, तेव्हा राजा 'उधार' झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने पीकं उद्ध्वस्त झाली. पण शेतकऱ्याला कवडीची मदत मिळाली नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात ‘पिकेल ते विकेल', असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom