Type Here to Get Search Results !

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणीपुणे, दि. १० : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.

यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली.

प्रकल्पाचा तपशील -
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळा (सिंहगड संस्था) पर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.
या प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.
खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधणे.

प्रकल्पाची गरज -
आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (६ लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (४ लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात.
आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
पॅकेज १ – खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता करणे
बोगदा क्र. १- १.७५ कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
बोगदा क्र.२ – ८.९२ कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
बोगद्यांची रुंदी २१.४५ मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे.
मुंबई व पुणे कडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेज व्दारे जोडण्यात येत आहेत.

पॅकेज २ – खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.
व्हायाडक्ट क्र. १- ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल
व्हायाडक्ट क्र. २ – ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल.
८ पदरीकरण – ५.८६ कि.मी. खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट

प्रकल्प बांधकाम सद्यस्थिती -
पॅकेज १ -खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता
बोगदा क्र. २ एक्झिटच्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे १९७९ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे १५५२ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.
बोगदा क्र. २ ला जोडणाऱ्या अडिट नंबर १ चे १३४० मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले असून नंबर २ चे ११५३ मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे.
बोगदा क्र. १ च्या पोर्टल पर्यंत पोहोचण्यासाठीच्या पोचरस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे.

पॅकेज २- खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.

सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटचे ८ पदरीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या ८ पदरीकरणांतर्गत येणाऱ्या मेजर ब्रिज नं. १. २ व ३ या तीनही पुलांचे रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.
व्हायाडक्ट क्र. १ च्या पायाभरणीचे काम देखील प्रगती पथावर आहे.
व्हायाडक्ट क्र. २ च्या आखणीपर्यंत पोचवण्यासाठीच्या पोचरस्त्यासाठी इतर काम पूर्ण झाले असून पोचरस्ता बांधकाम सद्यस्थितीत प्रगती पथावर आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक)
■ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण होणार आहे.
■ खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे १.६८ कि.मी. व ८.८७ कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे ०.९०० कि.मी. व ०.६५० कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.
■ या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.
■ या प्रकल्पास ४ जून २०१९ रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.
■ या प्रकल्पास २४ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज १ करीता (बोगद्याचे काम) मे. नवयुगा इंजिनिअरींग कं. लि. यांना २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज २ करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना १ मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
■ पॅकेज १ व पॅकेज २ चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.
■ या प्रकल्पाची एकूण किंमत रु.६६९५.३७ कोटी इतकी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सत्यजीत वाढोळकर आणि वर्षा वाढोळकर, सुयोग गुरव उपस्थित होते.

हेलिपॅडवर खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, एम एस आर डीसीचे राधेश्याम मोपलवार, आ. सुनील शेळके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad