गेल्या सात दिवसात १२९६ पक्षांच्या मृत्यूच्या तक्रारी

0


मुंबई - मुंबईत गेल्या सात दिवसात १२९६ तर २४ तासात २१४ कावळे, कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर नोंद झाल्या आहेत. मुंबईत बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मृत्यूच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.

राज्यात बर्ड फ्लूच्या तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने ५ डिसेंबरपासून १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीच्या सकाळी ७ वाजल्यापासून १७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत सात दिवसात १२९६ कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्षांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

२४ तासात २१४ पक्षांचा मृत्यू -
शनिवार १६ जानेवारीच्या सकाळी ७ ते रविवार १७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासात २१४ कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्षांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मुंबईतील कुलाबा, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, दादर, प्रभादेवी, वडाळा,माटुंगा, सायन, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरातून या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मृत पक्षांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे कावळा आणि कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

येथे साधा संपर्क -
मुंबईत मृत पक्षी आढळून येत आहेत. मृत पक्षी आढळून आल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. तसेच शासनाने नियुक्त केलेल्या रॅपिड रेस्पॉन्स टीममधील डॉ. हर्षल भोईर : 9987280921 आणि डॉ. अजय कांबळे : 9987404343 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

अशी घ्या काळजी -
१) कोणताही कच्चा मांसाहार टाळा.
२) कच्ची अंडी, कच्चे चिकन खाऊ नये, योग्य प्रकारे शिजवून घेणे आवश्यक आहे.
३) पोल्ट्री उद्योजकांनी, विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वच्छता पाळावी.
४) पशु, पक्षी यांच्याशी संपर्क टाळावा, त्यांची विष्ठा, लाळ यांच्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
५) घरातील पाळीव पशु, पक्षांची भांडी, पिंजरे स्वच्छ ठेवा.
६) उरलेल्या मांसाची योग्य ती विल्हेवाट लावावी.
७) एखादा पशु, पक्षी मरण पावलेला आढळला तर त्याला हात लावायचा नाही. त्याची सूचना पालिकेच्या आपत्कालीन विभागाला कळवावे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)