भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सरकारची मंजूरी

Anonymous
0


नवी दिल्ली - केंद्र सरकारने काल (शुक्रवार) सीरम कंपनीने तयार केलेल्या 'कोविशिल्ड' लसीला आपात्कालीन वापरासाठी सशर्त परवानगी दिली. आज दिल्लीत कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची महत्त्वाच्या बैठकीत भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीला मंजूरी दिली. औषध महानियंत्रक कार्यालयातील अधिकारी, कोरोना टास्क फोर्स आणि आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत भारतात दोन कोरोना लसींना तातडीच्या वापरासाठी सशर्त परवानगी देण्यात आली.

भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चबरोबर सहकार्य करत कोरोनावर लस तयार केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. यासोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सीरम कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीला भारत सरकारने सशर्त परवानगी दिली. तज्ज्ञांच्या समितीने या लसीला परवानगी देण्याची शिफारस औषध महानियंत्रक कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे आता भारतात लसीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज देशातील चार राज्यात लसीकरणासाठी ड्रायरन घेण्यात आला.

तातडीच्या वापरासाठी मागितला परवाना -
सीरम, भारत बायोटेक आणि फायजर कंपन्यांनी भारतात तातडीच्या वापरासाठी लसीचा परवाना मागितला होता. त्यातील सीरम आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत रित्या माहिती दिली.

कोरोना योद्ध्यांना मिळणार मोफत लस -
संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले होते. मात्र, त्यांनी लगेच युटर्न घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त प्राधान्य देण्यात आलेल्यांनाच लस मोफत मिळणार आहेत. पहिल्यांदा देशभरातील १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत दिली जाणार आहे. त्यानंतर दोन कोटी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना लस मोफत दिली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)