मुंबईतील चेकनाक्यावर होणार इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब

Anonymous
0


मुंबई - मुंबईतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढून बेस्टच्या उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी मुलुंड व दहिसर चेक नाक्यावर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब तयार केले जाणार आहे. गुरुवारी उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या सुविधांवर पालिका मुख्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. 

बेस्टच्या संदर्भात झालेल्या चर्चे दरम्यान कॉमन तिकीट प्रोग्रामच्या विषयावर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली. यावेळी मुंबईत होणा-या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी आणि बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुलुंड व दहिसर येथील चेकनाक्यावर ट्राफिक हब तयार करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. या योजनेअंतर्गत मुंबईत राज्य तसेच परराज्यातून येणा-या बसेस मुंबईच्या सिमेवर थांबवल्या जातील. तेथून बेस्टने त्य़ा प्रवाशांना मुंबईत आणले जाणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल असे ठाकरे यांनी सांगितले. बेस्टचा तोटा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. बेस्टचे उत्पन्न वाढण्याच्यादृष्टीने मुंबईतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यावर भर देणे आवश्यक आहे. 


मुंबईत रोज लाखो प्रवासी, पर्यटक मुंबईत येतात. या बसेस व इतर वाहने कुठेही, कशाही पार्क केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होते. या बसेसमध्ये असलेल्या महिला, वृद्ध, लहानमुलांचे हाल होतात. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य तसेच परराज्यातून येणा-या खासगी बसेस व इतर वाहने मुंबईच्या सिमेवर थांबवण्यासाठी दहिसर, मुलुंड, वाशी तसेस भविष्यात निर्माण होणारा नाव्हा शेवा चेकनाक्यावर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब तयार करा. तेथून बेस्टने त्या प्रवाशांची वाहतूक मुंबईत केली जाईल. यामुळे बेस्टचे उत्पन्न वाढेल व वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)