Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेणार - मराठा क्रांती मोर्चा



मुंबई - काँग्रेसने वेळोवेळी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आरक्षण देण्याचा मुद्दा असो किंवा औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे असो, या सर्व मुद्द्यांवर काँग्रेसने मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाटा पसरली असून उद्यापासून काँग्रेस विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी दिला. तसेच यावेळी शिवसेनेनेही आपले हिंदुत्त्व सिद्ध करावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. तसेच आता मराठा समाज ओबीसींमधूनच आरक्षण घेणार, असा इशारा कदम यांनी दिला आहे. 

सरकारमधील काही नेते मराठा आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्नात आहेत. मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मिळायला हवे अशी आमची आतापर्यंत भूमिका होती. मात्र आता ही भूमिका बदलणार असून ओबीसीमध्ये सामावून घेण्य़ाची मागणी करणार आहोत, असे कदम यांनी सांगितले.
आरक्षणाला स्थगिती येणे याला जबाबदार उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काही नेते असून ते मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप संघटनेने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. सरकारने ईडब्लूएस लागू करून करून धोका दिला आहे. मुख्य सुनावणीच्या आधी ईडब्लूएस लागू करणे हे मराठा आरक्षणाचा खून करण्यासारखे आहे, असेही संघटनेने म्हटले आहे. आम्ही ओबीसी म्हणून सिद्ध झालो आहोत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळायला हवे. येत्या काही दिवसात आम्ही आमची भूमिका जाहिर करू, असेही संघटनेने म्हटले आहे. सरकारमधील ज्येष्ठ मंत्री विजय वड्डेठीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे वारंवार मराठा विरोधी वक्तव्य करून मराठा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस मराठा द्रोही आहे. येत्या काळात या तिन्ही नेत्यांचा मराठा समाज योग्य तो समाचार घेईल, असा इशाराही कदम यांनी दिला. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे समन्वयक अंकुश कदम, गणेश माने, सत्यवान गायकवाड आदी उपस्थित होते.

आरक्षण हिसकावून घेऊ -
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून हलगर्जीपणा झाला आहे. आरक्षणाबाबत काही नेत्यांकडून संभ्रम निर्माण केला जातो आहे. आरक्षणाच्या महत्वाच्या सुनावणीला वकील न पाठवणे, आरक्षणाच्या प्रत्येक बैठकीला वेगवेगळ्या लोकांना बोलावून समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम करण्यात आले. आरक्षण मिळू नय़े असा प्रयत्न केला जातो आहे. मात्र आरक्षण हिसकावून घेऊ असा इशाराही संघटनेने दिला आहे.

काँग्रेसच्या विरोधात आंदोलन -
औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नामकरण करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जाते आहे. आता सरकारनेच संभाजी नगर नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काँग्रेसचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे नामकरण करू देणार नाही असे वक्तव्य़ केले आहे. थोरात यांचे हे वक्तव्य निषेधार्थ आहे. या वक्तव्या विरोधात शनिवारपासून आंदोलन छेडले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची हीच वेळ -
औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नामकरणास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर शिवसेना काय भूमिका घेणार आहे? शिवसेनेला महाराजांबाबत किती प्रेम आहे, हे दिसेल. शिवसेनेला आता हिंदुत्व सिध्द करावे लागेल. हीच वेळ असून ते काय निर्णय घेतात, त्याकडे आमचे लक्ष आहे असे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom