मराठा आरक्षण, अशोक चव्हाण शरद पवार यांची भेट

Anonymous
0


नवी दिल्ली, दि. 12 : मराठा आरक्षणासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत काल झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत तसेच या प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी खासदार पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत प्रधानमंत्री यांची भेट घ्यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबतही यावेळी चर्चा झाली. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ऍटर्नी जनरलला नोटीस दिली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बाजू मांडणे केंद्र सरकारला क्रमप्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा, १०२ व्या घटना दुरुस्तीचा राज्यांच्या अधिकारांवरील परिणाम आदींबाबत सकारात्मक बाजू मांडली तर एसईबीसी आरक्षणाच्या लढ्याला मोठी मदत होऊ शकेल. महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तर अनेक राज्यातील आरक्षणाचे प्रश्नही निकाली निघू शकतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असून, त्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने प्रधानमंत्री यांची भेट घ्यावी, असा हेतू आहे. या भेटीकरिता खासदार पवार पुढाकार घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)