माहीम बीच लवकरच नवीन स्वरुपात पहायला मिळणार

JPN NEWS
0


मुंबई, दि. 18 : पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम बीच येथील बीच रिनोवेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रिनोवेशन, दादर टिळक ब्रीज ट्रॅफिक मॅनेजमेंट व वीर कोतवाल उद्यान रिनोवेशनच्या कामांची पाहणी केली. यावेळी या कामांच्या प्रस्तावांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पर्यटन मंत्री ठाकरे यांनी या पाहणी दौऱ्याची सुरुवात माहीम बीचपासून केली. माहीम बीच येथे नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण २ हजार ४६० चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. श्री. ठाकरे यांनी यापुर्वी येथील वृक्षारोपणाच्या अभियानाची सुरुवात केली होती. या मोहीमेतून येथे जवळपास एक हजार मोठे वृक्ष व २ हजार २०० छोटी झुडपे लावली गेली आहेत. ज्यामुळे पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओपन जीम देखील बनवली जाणार आहे. तसेच वॉच टॉवर सारखी अनोखी कल्पना येथे साकार होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी पर्यटन मंत्री ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या ५ किलोमीटरच्या प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकबद्दल देखील चर्चा केली. या ट्रॅक संदर्भातील व्यवहार्य शक्यतांबद्दल अभ्यास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट दिली. या भेटीच्या सुरुवातीलाच त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. या मैदानाला खेळाचा, संस्कृतीचा, राजकारणाचा समृद्ध असा इतिहास आहे. या इतिहासाला कुठेही धक्का न लागू देता मैदानाचे पावित्र्य जपून याचा विकास करण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला.

या मैदानात सकाळी व संध्याकाळी बरेच लोक चालायला व धावायला येतात. मात्र तेथे इतर खेळ खेळले जात असल्यामुळे प्रचंड धुळ उडते. या धुळीला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर श्री. ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच येणाऱ्या दहा वर्षांचा विचार करून भव्यदिव्य अशा मैदानाचा वापर करून रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या मार्गाने पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने व्ययहार्यता तपासण्यात यावी, असेही मंत्री ठाकरे यांनी सांगितले. मैदानाच्या बाजूला १०० वर्ष जुना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेला ‘प्याऊ’ आहे. या प्याऊची डागडुजी करून तो पुन्हा वापरात आणण्यासंदर्भात योग्य पावले उचलली जावीत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी नवीन क्यूआर कोड असलेल्या दिशादर्शकांची देखील पाहणी केली. हे दिशादर्शक दिशा दाखवतीलच, मात्र त्याच्या सोबतच हे क्युआर कोड आपल्याला त्या रस्त्याच्या नावाचा इतिहास, माहिती सांगतील. प्रस्तावित माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे बद्दलही यावेळी चर्चा झाली.

आदित्य ठाकरे यांनी दादर येथील टिळक ब्रीज व वीर कोतवाल उद्यान यांची देखील पाहणी केली. टिळक ब्रीज येथे होणाऱ्या ट्रॅफिकचे व्यवस्थापन करून ट्रॅफिक तत्काळ कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी करताना चर्चा केली. मुंबई महापालिका यासंदर्भातील दीर्घकालीन योजनेवर काम करत आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी वीर कोतवाल उद्यानातील सुंदर अशा वॉकिंग ट्रॅक संदर्भात चर्चा केली. नगरसेविका प्रिती पाटणकर, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !