Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई, दि. 11 : बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेतला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेऊन नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3 ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, परभणीत 843 कोंबड्या, ठाण्यात बगळे व इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे बर्ड फ्लू अहवाल एच5एन1 व बीड येथील 11 कावळ्यांचा अहवाल एच5एन8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपळहून प्राप्त व्हायचे आहेत.

पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. केंद्र शासनाच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 7 जानेवारीपासून कंट्रोल रूम स्थापित केले असून मृत पक्षांची माहिती घेणे सुरू आहे. पक्षांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे अशाही सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom