कोस्टल रोड बोगदा खोदकामाचा आज मुख्यमंत्र्यांच्या ह्स्ते प्रारंभ

Anonymous
0

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा 'सागरी किनारा रस्ता' बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याचा बोगदा खोदकामाचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (सोमवारी, ११ जानेवारी रोजी) दुपारी १ वाजता होणार आहे.

मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत बोगदा खोदकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या बोगदा खोदकामासाठी आणलेले 'मावळा' यंत्र यावेळी कार्यान्वित करण्यात येणार आहे. पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत. हा कार्यक्रम 'डी' विभागातील 'प्रियदर्शनी पार्क' येथे होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

"मावळा" खोदणार बोगदे -
कोस्टल रोड पूल व भुयारी मार्गाद्वारे उभारला जात आहे. त्यासाठी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड मशीन आणण्यात आली आहे. या मशीनचा व्यास 39.6 फूट आहे. भारतातील सर्वात मोठा व्यास असलेली ही मशीन आहे. या मशीनला "मावळा", असे नाव देण्यात आले आहे. ही मशीन पूर्ण तयार झाली असून बोगदे खोदण्यास सज्ज झाली आहे. कोस्टल रोडसाठी समुद्राखालून 400 मिटरचे बोगदे खोदण्याचे काम उद्यापासून सुरू होईल. एक बोगदा खोदण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी लागणार असून 18 महिन्यात कोस्टल रोडसाठी दोन बोगदे खोदून तयार होणार आहेत.

17 टक्के काम पूर्ण, 1 हजार 281 कोटी खर्च -
मुंबईमधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी फ्री वे बनवण्यात आला आहे. त्यानंतर पश्चिम उपनगरात जाण्यासाठी कमी वेळ लागावा म्हणून कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. कोस्टल रोडचे काम तीन टप्यात होणार असून अमरसन्स गार्डन प्रिन्सेस स्टिट ब्रिज ते वरळी सिलिंक, असा पहिला टप्पा मुंबई महापालिका तयार करत असून यासाठी पालिका 12 हजार 721 रुपये खर्च करणार आहे. कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असून 17 टक्के पूर्ण झाले आहे. त्यासाठी आतापर्यंत 1 हजार 281 कोटी खर्च करण्यात आले आहेत. कोस्टल रोडचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

समुद्रात भराव -
कोस्टल रोडच्या कामासाठी अरबी समुद्रात सुमारे 300 एकर जमिनीवर भराव टाकला जाणार आहे. त्यापैकी 175 एकर जागेवर भराव टाकण्यात आला आहे. अजून 102 एकर जागेवर भराव टाकण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)