Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

प्रजासत्ताक दिनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळा



मुंबई, दि. 21 : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची दक्षता घ्यावी. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना नुकत्याच देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धेचे आयोजन करावे. महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावे, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहीम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

२६ जानेवारी, २०२१ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९.१५ वाजता आयोजित करण्यात यावा. हा समारंभ आयोजित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १०.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.

विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. तसेच राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालये येथे ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्विकारतील. राज्यामध्ये या दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी, अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वत: ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक दिनांक २ मार्च १९९१, ५ डिसेंबर १९९१ तसेच ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला मर्यादित शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी.

उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित रहाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग, कार्यालय प्रमुख यांनी द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोना योध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे.

विभागीय आयुक्त, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाकरिता योग्य ती व्यवस्था करणार असल्यामुळे जिल्हाधिकारी पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे यासंबंधी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. राज्यपाल हे सकाळी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील.

संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपापल्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यांच्या अधिकार क्षेत्रात त्या दिवशी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करुन सर्व बाबी योग्य पद्धतीने कार्यान्वित होतील याबाबत त्यांनी व्यक्तीश: दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom