मुंबईत १ लाख ५८ हजार लसीचा साठा उपलब्ध

JPN NEWS
0


मुंबई - मुंबई महापालिकेला कोविड प्रतिबंध लसीचे १ लाख ५८ हजार डोस रविवारी प्राप्त असून सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे सोमवारी २६ ते बुधवारी २८ एप्रिल असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, उपलब्ध झालेल्या साठ्यात कोव्हॅवॅक्सिन लसीचा साठा अत्यंत मर्यादित असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाºयांना ही लस प्राधान्याने दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. 

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ५९ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते आहे. त्यातही दुसरा डोस घेणाºयांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

लसीचा साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्या केंद्रांनी रविवारी लसींचा साठा नेला नाही, त्यांना सकाळी दिला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी, २६ एप्रिल रोजी काही केंद्रांवर लसीकरण उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

कांजूरमार्ग केंद्रातून लसीचे वितरण -
महानगर पालिकेला रविवारी कोविशिल्ड लसीच्या १ लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या ८ हजार अशा एकूण १ लाख ५८ हजार डोस प्राप्त झाला आहे. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !