दिवसाला ४० हजार चाचण्यांचा पालिकेला विसर

Anonymous
0


मुंबई - कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेने दिवसाला ४० हजार चाचण्या करणार, असा गाजावाजा केला. सुरुवातीच्या काळात काही दिवस ३५ ते ४० हजार चाचण्या रोज होत होत्या. परंतु काही दिवसांनी पालिकेलाच रोज ४० हजार चाचण्या करण्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. सध्या दिवसाला २० ते २५ हजारांच्या घरात चाचण्या होत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्ण संख्येत घट होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे रोज होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत घट झाली आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट झाले असले तरीही त्यामागे दररोजच्या चाचण्यांची संख्या कमी जास्त होत असल्याचे आढळून येत आहे. ५ ते २० मे पर्यंतच्या चाचण्या आणि रुग्ण संख्येचा आढावा घेतल्यास काही दिवस चाचण्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे समोर आले आहे.

पालिकेने यापूर्वी दररोज ४० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठरविले होते. मात्र, चाचण्यांची संख्या गेल्या १५ दिवसांत सर्वाधिक म्हणजे ३५ हजारांवर गेली असून चक्रीवादळाच्या दिवशी म्हणजे कमीत कमी संख्या १७,६४० एवढी नोंदविली आहे.

मुंबईत फेब्रुवारी मध्यापासून कोरोना रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढू लागली. एका क्षणी दिवसाला १० ते ११ हजार नवीन रुग्ण दाखल होऊ लागल्याने चिंतेची स्थिती होती. या संपूर्ण कालावधीत पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आपसूकच नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढत गेले.

राज्यात लॉकडाऊन लागू लागल्यानंतर गर्दीचे प्रमाण कमी झाले आणि रुग्ण संख्याही कमी होत गेली. सध्या मुंबईत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १,४०० पर्यंत कमी झाली आहे. मंगळवार, १८ मे रोजी ९८९ नवीन रुग्ण आढळले होते. मात्र त्यादिवशी चाचण्यांची संख्या केवळ १८ हजार इतकीच होती.

५ ते २० मे दरम्यान दिवसाला ३० हजारांच्या जवळपास चाचण्या -
५ ते २० मे या कालावधीत काही दिवसांत चाचण्यांची संख्या २३ हजार, २४ हजार, २५ हजार, ३० हजार, ३२ हजार, ३५ हजार अशा प्रमाणात आहे. त्यामुळे, मुंबईत रुग्ण संख्या कमी होण्याचे समाधान वाटत असतानाच चाचण्यांचे प्रमाणही कमी होत असल्याची बाजू त्यास असल्याचे बोलले जाते.

पालिकेकडून कमी चाचण्या होण्यामागे लॉकडाऊनमुळे मॉल, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी होणारी गर्दी कमी झाल्याचा दाखल दिला जात आहे. तसेच, बहुतांश कॉर्पोरट कार्यालयांमधील उपस्थिती रोडावल्याने तिथे होणाऱ्या चाचण्याही आपसूकच कमी झाल्याचे सांगितले जाते. पालिकेनेही चाचण्यांचे अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्या प्रमाणात चाचण्या करण्यावर भर दिला. त्यामुळे गेल्या १५ दिवसांमध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी- अधिक स्वरूपाचे ठरले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)