कोरोना संकटात जीएसटीची साथनवी दिल्ली : देशात कोरोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. काही राज्यांनी वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रोजगार आणि उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे. तरीही यंदाच्या एप्रिलमध्ये विक्रमी जीएसटी संकलनाची नोंद झाली आहे. सरकारच्या तिजोरीत 1 लाख 41 हजार कोटी रुपयांचा महसूल पडला आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढय़ाला मोठे बळ मिळणार आहे.

केंद्रीय अर्थखात्याने ट्विटरवरून ही माहिती दिली. अर्थ खात्याने सांगितले की, सलग सातव्या महिन्यात 1 लाख कोटीच्या वर जीएसटी मिळाला आहे. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. त्यामुळे मागील सलग सात महिने एक लाख कोटींचे जीएसटी उत्पन्न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळाआहे.

एप्रिल 2021 या महिन्यात एकूण 1 लाख 41 हजार 384 लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीत केंद्राचा 27,837 कोटी, राज्याचा 35,621 कोटी, एकीकृत जीएसटी 68,481 कोटी आहे. त्यात उपकर 9,445 कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यात 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल झाला.

मार्च 2021 मध्ये जीएसटी संकलन 1.24 लाख कोटी रुपये झाले. त्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 14 टक्क्याने वाढले. एप्रिलमध्ये आंशिक लॉकडाऊन लावल्याने जीएसटी संकलन घटेल, असे वाटत होते. एसबीआयच्या अहवालातही जीएसटी संकलन 1.15 ते 1.20 लाख कोटी रुपये राहण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, त्यांचा अंदाज खोटा ठरला आहे.

ऑक्टोबर (2020) महिन्यात 1,05,155 कोटी, नोव्हेंबर (2020) महिन्यात 1,04,963 कोटी, डिसेंबर (2020) महिन्यात 1,15,174 कोटी, जानेवारी (2021) महिन्यात 1,19,847 कोटी, फेब्रुवारी (2021) 1,13,143 कोटी, तर मार्च (2021) या महिन्यात 1,23,902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली होती. मात्र एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने स्थिती गंभीर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post