एमएमआरडीएमार्फत सुरु असलेल्या कामांची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

23 May 2021

एमएमआरडीएमार्फत सुरु असलेल्या कामांची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

 

मुंबई, दि. 23 : एमएमआरडीएमार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरु असलेल्या विविध कामांची आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. मालाड (पश्चिम) येथे एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोव्हिड-19 हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी मुंबईत पुरेशा उपचार सुविधांची उपलब्धता करणे तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने हे सुसज्ज समर्पित कोविड 19 हॉस्पिटल उभारण्यात येत आहे, असे पालकमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी उपस्थित होते.

यानंतर पालकमंत्री ठाकरे यांनी मालाड (पूर्व) येथील भुस्खलन झालेल्या जागेला भेट दिली. मागील वर्षी भुस्खलन झालेल्या या जागेवर यंदा एमएमआरडीएमार्फत आयआयटीच्या सहयोगातून  भूस्खलन रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम जलदगतीने करण्यात येत आहे.

यानंतर पालकमंत्री ठाकरे यांनी एमएमआरडीएमार्फत काम सुरु असलेल्या कलानगर उड्डाणपूलाच्या मार्गिकेची पाहणी केली. या मार्गिकेचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून कलानगर जंक्शन येथील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल.

शहरात एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेली ही विविध कामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत. तसेच पावसाळ्यात लोकांची सोय होण्याच्या दृष्टीने कामे जलदगतीने करण्यात यावीत, अशा सूचना पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, सहआयुक्त बी.जी. पवार आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post Top Ad

test