नायर रुग्णालयात १००१ व्या कोविड बाधित मातेची सुखरुप प्रसूती

0


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात 'कोविड १९' बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने एक हजारचा टप्पा ओलांडला आहे. नायर रुग्णालयात १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची प्रसूती झाली होती. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात १००१ कोविड बाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह १९ जुळ्या बाळांचा समावेश असून एकूण १०२२ बाळांचा जन्म नायर रुग्णालयात झाला आहे.

गेल्यावर्षी एप्रिल २०२० मध्ये 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर १००१ कोविड बाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह १९ जुळ्या बाळांचा समावेश असून यानुसार एकूण १०२२ बाळांचा जन्म नायर रुग्णालयात झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक आणि अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कमचा-यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास अव्याहतपणे काम केले आहे. डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकदा घरी न जाता रुग्णालयात राहून अविरतपणे रुग्णसेवेचे काम करीत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. रुग्णालयाचे संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.

कोविड बाधित चिमुकल्यांची कोरोनावर मात -
कोविडचा संसर्ग हा जन्मत: होत नाही. पोटात असणा-या बाळाच्या आईला जरी कोविडचा संसर्ग असेल, तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय उपचार क्रमानुसार कोविड बाधित मातेपासून जन्मलेल्या नवजात शिशुंची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी केली जाते. यानुसार वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या तान्हुल्यांपैकी काही नवजात शिशुंची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. 'डिस्चार्ज' देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी 'निगेटिव्ह' आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, असे डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)