पूर आणि दरडी कोसळून २७९ व्यक्तींचा तर २९ हजार १२० जनावरांचा मृत्यू

Anonymous
0


मुंबई २६ जुलै - राज्यात १ जून ते २६ जुलै दरम्यान ६५३.६ इतका सरासरी पाऊस कोसळला. या दरम्यान पूर आणि दरडी कोसळून २७९ व्यक्तींचा तर २९ हजार १२० छोट्या- मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. २५ जण अद्यापही बेपत्ता असून ३ लाख ७५ हजार १७८ लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने आज सोमवारी दिली.

दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती ओढावते. अतिवृष्टी, नद्यांना पूर येणे, दरडी कोसळणे, वीजा पडणे यासह इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांना प्राण गमवावा लागतो. यंदा जिल्ह्यात १ जूनपासून २६ जुलैपर्यंत मुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. जवळपास १०४३ गावांना त्याचा फटका बसला. १६ घरे जमीनदोस्त तर ६ घरांची पडझड झाली. बेघर झालेल्यांसाठी २५९ छावण्यामध्ये व्यवस्था केली. तर ७८३२ छावण्या तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आल्या. गेल्या २४ तासांत कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ६०८५ छावण्या तयार केल्या आहेत. जिल्ह्यात एक लाख ९४ हजार ४६४ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य मदत व पुनर्वसन विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे तसेच मुंबई उपनगर या १० जिल्ह्यांना जोरदार फटका बसला. कोल्हापूर ३९६, सांगली ९२, सातारा १२० आणि पुणे ४२० अशी एकूण १०२८ गावे बाधित झाली. तीन लाख ७५ हजार १७८ व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यात आली. पैकी ८०९१ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. आतपर्यंत ९९ व्यक्ती जखमी झाले. तर दोन दिवसांत मुंबईत ७, रायगड २६, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी ७ आणि ठाणेमधील ६ अशा एकूण ४८ लोक जखमी झाल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच २५ व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद विभागाकडे झाली आहे.

अतिवृष्टी काळात सर्वाधिक २९ हजार १२० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी गेल्या दोन दिवसांत सांगलीमध्ये १९३०७, कोल्हापूरमध्ये ४९८०, साताऱ्यात ३००० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५३० अशा एकूण २८ हजार ८०७ जनावरांचा समावेश आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाचे म्हणणे आहे.

१ जूनपासून आतापर्यंत ४३ रस्ते मार्गाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूल वाहून तर काही ठिकाणी रस्ते खचल्याने मार्ग बंद झाले आहेत. मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचा यात समावेश आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)