मुंबईत आजपासून अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण

Anonymous
0मुंबई - शारीरिक वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकार व मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात आजपासून अंधेरी पूर्व येथील के/पूर्व प्रभागातुन प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. त्यासाठी प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचे देखील सहकार्य लाभणार आहे अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणा सारखे उपक्रमही महानगरपालिकेने राबवले आहेत. असे असले तरी, आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अश्या व्यक्तींना त्यांच्या घरीच जावून कोविड लस देण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य शासनाने देखील संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे (bedridden) व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता, आतापर्यंत ४ हजार ४६६ व्यक्तींची नावे प्राप्त झाली आहेत.

अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे लसीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वं देखील निश्चित केली आहेत. ज्यांचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रं देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्रं संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले असून त्यानुसार कोवॅक्सिन ही लस देण्यात येईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण करुन त्याबाबत विहित आवश्यक ती सर्व प्रक्रिया पाळण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरु झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करुन पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे.

दरम्यान, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे लसीकरण करण्याची कार्यवाही सुलभरीतीने पार पाडता यावी, यासाठी आवश्यकता असल्यास बिगरशासकीय, सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यानुसार, प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय संस्थेच्या सहकार्याने लसीकरणाची कार्यवाही करणार आहे असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)