मुंबई बाहेरील प्रवाशांची धास्ती - लोकल सुरु करण्याबाबत सावध पवित्रा

Anonymous
0


मुंबई - मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुंबई बाहेरून रोज ४० लाखांवर रेल्वे प्रवासी एमएमआर क्षेत्रातून मुंबईत प्रवास करतात. या प्रवाशांमुळे कोरोना पुन्हा वाढण्याची भिती आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत प्रशासनाकडून सावध भूमिका घेतली जात असून तूर्तास सर्वांसाठी लोक नको अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. पालिकेने राज्य सरकारला कोरोना स्थितीचा आराखडा सादर केला आहे. 

मुंबईत फेब्रुवारीत कोरोनाच्या दुस-या लाटेत झपाट्याने रुग्ण वाढले. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजनेंतर्गत मुंबईतील रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात आहे. मात्र ऑगस्टमध्ये तिस-या लाटेचा धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. शिवाय गणेशोत्सवासह इतर सणही आल्याने रेल्वे सुरु केल्यास गर्दी वाढून पुन्हा कोरोना वाढण्य़ाची शक्यता आहे. राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्बंध शिथील करण्यासाठी निश्चित केलेल्या ‘आराखड्या’नुसार चाचण्यांच्या प्रमाणात ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे मुंबईचा समावेश ‘पहिल्या स्तरात’ होत असताना निर्बंध मात्र तिसर्‍या टप्प्यातील कायम ठेवण्यात आले आहेत. यानुसार मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ९२५ दिवसांवर गेला असून दररोज ३० हजारांवर चाचण्या होत असताना सरासरी रुग्णवाढ ०.०७ टक्क्यांपर्यंत खाली असून गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यू दरही एक टक्क्यापेक्षा खाली राहिला आहे. मात्र रोज सुमारे ८० लाख प्रवासी लोकलने प्रवास करीत असल्याने गर्दी वाढून कोरोना वाढण्याची भिती असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सरसकट निर्बंध उठल्यास कोरोनाला निमंत्रण -
शहरात मुंबईबाहेरून येणार्‍या प्रवाशांची मोठी गर्दी असते. नाशिकहून येणारा रोजचे भाजीपाला विक्रेते; कोल्हापूर, पुणे, गुजरात, पालघर आदी भागातून दूध-भाजी विक्रेते-व्यावसायिकांच्या चाचण्या, या गोष्टींचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध उठवल्यास गर्दी वाढेल. त्यामुळे टप्प्याटप्प्यानेच निर्बंध शिथील करावे लागतील असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून सूट
पालिकेने सध्या लसीकरणावर भर दिला आहे. मुंबईत सध्या लशीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या १३ लाखावर आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंध आणि रेल्वे प्रवासात सूट द्यावी अशी मागणी जोर धरली आहे. या पार्श्वभूमीवरही पालिका प्रशासन विचार आहे. येत्या दोन - तीन दिवसांत याबाबत राज्य सरकारसोबत पालिकेची बैठक होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)