मुंबई अग्निशमन दलात येणार देशी बनावटीची ब्रेकडाऊन व्हॅनमुंबई - मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता देशी बनावटीची ब्रेकडाऊन व्हॅन दाखल होणार आहे. ही व्हॅन रस्त्यावर अचानक बंद पडणा-या वाहनांना दुरुस्तीसाठी ओढून अथवा उचलून आणण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. जुन्या व्हॅनची कार्यक्षमता संपल्याने ही नवी खरेदी केली जाणार आहे. वर्षभरात ही व्हॅन सेवेत दाखल होईल. यासाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबई अग्निशमन दलाची ३५ अग्निशमन केंद्र असून २५८ वाहनांचा ताफा आहे. ही वाहने अत्याधुनिक प्रकारची आहेत. अनेक वाहने विदेशातून आयात केलेली आहेत. यात फायर इंजिन, वॉटर टँकर, टर्न टेबल लॅडर, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म, रेस्क्यू व्हॅन अशा विविध प्रकारची जड वाहने आहेत. रस्त्यावर ही वाहने बंद पडल्यास तात्काळ दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ओढून अथवा उचलून आणावी लागतात. त्यासाठी ब्रेकडाऊन व्हॅन असणे आवश्यक आहे. दलात सध्या ब्रेकडाऊन व्हॅन आहे, मात्र ती सन १९९५ मध्ये खरेदी करण्यात आली असून या वाहनाचा सेवा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे अधून मधून दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. शिवाय या गाडीचे सुटे भाग मिळत नसल्याने पालिकेने नवीन व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अँटनी गॅरेज यांच्याकडून या व्हॅनची बांधणी करून घेतली जाणार आहे. पालिका यासाठी एक कोटी ४९ लाख ९९ हजार रुपये खर्च येणार आहे. या व्हॅनची ४० टन ओढण्याची व २० टन उचलण्याची क्षमता आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post