पक्ष सोडणाऱ्यांबद्दल राहुल गांधींची भूमिका रास्तच ! - नसीम खान

Anonymous
0


मुंबई - काँग्रेस पक्षातील काही लोक आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. हे लोक घाबरट असून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडावा आणि निडर लोकांना काँग्रेसमध्ये घ्यावे ही राहुलजी गांधी यांची भूमिका रास्त असून आमचा या भूमिकेला पाठिंबा आहे, असे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.

नसीम खान पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसचा विचार हाच देशाला तारणारा विचार असून सर्व जाती, धर्माच्या लोकांचा काँग्रेसमध्ये सन्मान राखला जातो. राहुल गांधी यांची लढाई ही फॅसिस्ट विचारांच्या लोकांशी आहे, ही लढाई लढण्यासाठी राहुल गांधी यांच्या पाठिशी आपण सर्वांनी भक्कपणे उभे राहिले पाहिजे. जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या विचाराचे आणि भित्रे, घाबरट आहेत असे लोक राहुल गांधी व काँग्रेसची लढाई लढू शकणार नाहीत, म्हणून राहुलजी यांनी घेतलेली भूमिका एकदम रास्त असून काँग्रेस विचारांवर ज्यांची श्रद्धा आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्ष व राहुलजी, सोनियाजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आल्यापासून विरोधी पक्षांच्या लोकांना ईडी, सीबीआय सारख्या संस्थांच्या माध्यमातून भिती दाखवली जात आहे. या दबावाला बळी पडून, घाबरूनच काँग्रेस पक्षातील काही लोकांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. काँग्रेस पक्षाने अशा लोकांना विविध पदे देऊन सन्मान केला पण पक्षाला गरज असताना मात्र घाबरून पळून जात आहेत, असे लोक गेले तरी न घाबरता काँग्रेस पक्षासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. राहुल गांधी यांच्या बरोबरीने हेच कार्यकर्ते फॅसिस्ट विचाराविरोधात लढा देतील, असेही नसीम खान म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)