मुंबईत आजपासून ३५ केंद्रांवर गर्भवती मातांचे लसीकरण

Anonymous
0

 


मुंबई - कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतर्फे विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या जात आहेत. सध्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आज (१५ जुलै) पासून गर्भवती मातांचे लसीकरण केले जाणार आहे. एकूण ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु केले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

केंद्र शासनाच्या आदेशानंतर १६ जानेवारी पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुंबईत टप्प्या-टप्प्याने नियमितपणे लसीकरण केले जात आहे. १९ मे २०२१ पासून स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तर आता ‘राष्‍ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्‍लागार गट’ व ‘कोविड - १९’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्‍ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्‍या शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड - १९’ लसीकरणात समाविष्‍ट केले आहे. यानुसार आजपासून ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

कोरोना या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड - १९’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोना बाधित ९० टक्के गरोदर महिलांना दवाखान्यात दाखल होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे १० टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड - १९’ आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. बाधित ९५ टक्के मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित ५ टक्के नवजात बालके प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी जन्माला येऊ शकतात. अशा बालकांच्या बाबत त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणा-या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरु शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे कोरोना लसीकरण करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. 

लसीकरणाबाबत सरकारचे निर्देश-- 
- मुंबईतील लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.
- ज्या महिलांना ‘कोविड - १९’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल.
- लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्‍ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा १ ते ३ दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते. तुरळक स्वरूपात १ ते ५ लाख लोकांमधील एखादया लाभार्थ्‍यास लसीकरणानंतर २० दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)