Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींवर मार्ग काढला जाईल - मुख्यमंत्री



मुंबई, दि. 2 : अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढण्यात येईल व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वर्षा येथील समिती कक्षामध्ये आंबा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीमुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकरी बांधवांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. याबाबत सहकार विभागाशी चर्चा करुन लवकरच शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, गेली चार वर्ष आंबा पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात आले आहेत. बँकाकडून घेतलेली पीक कर्जाची रक्कम थकीत झाली आहे. परिणामी बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे. व्याजासह कर्ज रक्कम न भरल्यास शेतकऱ्यांना नोटिस देण्यात येत आहेत.

सन २०१४-१५ मध्ये अवकाळी पाऊस झाला.त्यावेळी शासनाने पीक कर्जावरील तीन महिन्याच्या व्याजाची रक्कम माफ केली. परंतु ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. तसेच पुनर्गठित कर्ज रकमेवरील पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकऱ्यांकडून मात्र बँकांनी वसुली केली आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठन प्रक्रिया होणे आवश्यक आहे.

बैठकीत आंबा पिकावरील फवारणीसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांवरील किंमती नियंत्रणात आणणे व त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटी करांमध्ये सवलत मिळण्याबाबत विचार व्हावा याबाबत ही चर्चा करण्यात आली. तसेच आंबा हंगाम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू असतो. विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी आंबा हंगामासाठी पाऊस पडण्याच्या निकषामध्ये दि.१५ मे पर्यंत पाऊस पडला असेल तरच नुकसान भरपाई मिळते. परंतु याचा फायदा रत्नागिरीतील उत्पादकांना मिळत नाही. या भागात तारखे मध्ये बदल करून ती दि. ३१ मे पर्यंत तारीख निश्चित करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom