आर्यन खानला जामीन

Anonymous
0


मुंबई : ड्रग्ज प्रकरणी मागील २५ दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. मात्र, आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरु होईल.

आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं आर्यनचे वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितलं. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी अटी-शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)