महिला प्रवाशांसाठी बेस्टच्या 100 बसेस सुरू

Anonymous
0


मुंबई - मुंबईमधील महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी बेस्टच्या बसमधून सुखद आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट या तत्वावर 100 बसेस आजपासून सुरू केल्या आहेत. ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकर महिलाना दिलेली भाऊबीजेची भेट आहे. मुंबईकर महिलांनी या बसचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेस्ट उपक्रमाकडून लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट बस सेवेचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उप महापौर सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या बस सेवेच्या लोकार्पणानंतर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येतात. गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांसाठी 100 विशेष बस सुरू केल्याने महिला प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. या बसमुळे महिला प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाऊबीज म्हणून मुंबईकर महिला प्रवाशांना ही दिलेली भेट आहे असे महापौरांनी म्हटले आहे.

बेस्ट उपक्रमाकडून महिला प्रवाशांसाठी विशेष बस फेऱ्या चालविल्या जातात. नोव्हेंबर २०१९ पासून महिलांसाठी आरक्षित बस 'तेजस्विनी' नावाने टप्प्याटप्यात ताफ्यात येऊ लागल्या. आजघडीला साधारण ३७ 'तेजस्विनी' धावत आहेत. सकाळी ८ ते सकाळी ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत महिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी' चालविण्यात यायच्या. परंतु मुंबईत कोरोनाचा कहर झाल्यानंतर महिलांची संख्याही कमी झाली होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने बेस्ट बसमधील प्रवाशांची गर्दी आता पूर्वीप्रमाणे वाढली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने महिला स्पेशल गाड्यांची संख्याही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाऊबीज या सणापासून महिला प्रवाशांसाठी लेडिज स्पेशल बस सुरु करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या ३७ महिला स्पेशल बस धावतात. त्यात या १०० बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या १३७ झाली आहे. या बसमुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)