नाले, पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांसाठी उणे ३४ टक्के दराने काम

0


मुंबई - बोरिवली पश्चिमेला काही छोट्या-मोठ्या नाल्यांच्या संरक्षक भिंती बिनथरीच्या दगडांमुळे कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यावर उपाय योजनांसाठी पालिकेने नाल्यांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या जोडण्या विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले. या समस्येमुळे पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आवश्यक कामे करण्यासाठी कंत्राटदाराने तब्बल ३४ टक्के कमी दराने म्हणजेच २ कोटी २४ लाख ९० हजार रुपयांत ही कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र पालिकेच्या अंदाजित दरांपेक्षा ३४ टक्के कमी दराने कामे केली जात असल्याने कामांचा दर्जा राखला जाईल का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
 
बोरिवली पश्चिमेकडील काही नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केली. त्यावेळी, काही भागात पर्ज्यन जलवाहिन्यांकडे आवश्यक असलेल्या जोडण्याचा अभाव आढळल्या. तसेच, बऱ्याच ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या आणि नाल्यांच्या संरक्षक भिंती मोडकळीस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिथून पाणी वाहून जाण्यात अडथळे येत आहेत. आर/उत्तर विभागातील कॉस्मिक लॉज ते लिंक मार्ग, दुबे मार्ग, पश्चिम द्रूतगती महामार्ग ते सागर ज्वेलर्स, सेजल पार्कजवळील पर्जन्य जलवाहिन्या, केशव नगरजवळील सुधाकर कंपाऊंड येथील जलवाहिन्या आणि नाल्यांची कामे केली केली जाणार आहेत.

त्यासाठी पालिकेने ३ कोटी ४० लाख ४० हजार रुपयाचे कार्यालयीन अंदाज पत्रक तयार केले होते. त्यावर, पालिकेने मागविलेल्या निविदांमध्ये विविध कंत्राटदारांनी कमी दराने कामे करण्यास तयारी दर्शविली. त्यात, सर्वात कमी म्हणजे उणे ३३.९३ टक्के दराने निविदा भरणाऱ्या कंत्राटदारास पसंती दर्शविण्यात आली आहे. उणे ३३.९३ टक्के दराने हे काम २ कोटी २४ लाख ९० हजारात होणार आहे.

पालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. या कामासाठी इच्छुक सातही कंत्राटदारांनी उणे दर दर्शिवला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जा कसा असेल यावर स्थायी समितीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)