पालिका निवडणुक - आरक्षण लॉटरी डिसेंबरपर्यंत, निवडणूक नियोजित वेळेतच

0


मुंबई - मुंबईतील २२७ प्रभागांच्या पुनर्रचना आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आरक्षण लॉटरी प्रलंबित आहे. मात्र असे असले तरी मुंबई महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेतच होणार असल्याचा दावा राज्य निवडणूक आयोगाने केला आहे. या पार्श्वभूमीवर आराखडा मंजुरी आणि आरक्षण लॉटरीची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल असे आयोगाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ पर्यंत असून फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित आहे. सन २०१७ मध्ये २१ फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. मुंबईत कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली कोरोना रुग्णसंख्या व तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेत होणार नाही व निवडणूक पुढे ढकलण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता कोरोना नियंत्रणात असल्याने निवडणूक घेण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे. पालिकेने मुंबईतील २२७ प्रभागांच्या पुनर्रचनांचा कच्चा आराखडा बनवून तो मागील महिन्यात आयोगाकडे पाठवला आहे.

गेल्या सन २०१७ मध्ये पालिकेची १४ वी सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी झाली. या निवडणूकीचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर झाला होता. सप्टेंबरमध्ये प्रभाग आराखडा प्रसिद्ध होऊन तीन ऑक्टोबर २०१७ रोजी आरक्षण लॉटरी काढण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे २०२२ च्या निवडणुकीची तयारी धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे यावेळी नियोजित वेळेनुसार निवडणूक होणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सार्वत्रिक निवडणूक नियोजित वेळेत होणार असल्याचे आयोगाने संकेत दिले आहेत.

पालिकेने पाठवलेल्या प्रभाग पुनर्रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आयोगाची तपासणी सुरू आहे. आराखड्यात आयोगाची निरीक्षणे नोंदवली जातील. या निरीक्षणांच्या सुधारणांसाठी आराखडा पुन्हा पालिकेकडे पाठवला जाईल. पालिका सुधारित आराखडा आयोगाला पाठवेल. आयोगाच्या मंजुरीनंतर पालिका तो प्रसिद्ध करेल. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. त्यावर नागरिक व राजकीय पक्षांनी घेतलेल्या हरकतींवरील सुनावणीसाठी आयोग आपला अधिकारी नियुक्त करेल. या प्रक्रियेतून आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल. या दरम्यानच्या काळात आरक्षण लॉटरी देखील काढली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)