पूर्व उपनगरांत चार, पश्चिम उपनगरात पाच प्रभाग वाढणार

0


मुंबई - लोकसंख्या वाढल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे ९ प्रभाग वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढणार असल्याचे समोर आले आहे. यात पूर्व उपनगरात चार तर पश्चिम उपनगरात पाच प्रभाग वाढणार आहे. मुंबई शहरात मात्र प्रभागात वाढ होणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार असल्याने पालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबरमध्ये सादर केला होता. यानुसार लोकसंख्या वाढलेल्या भागात नगरसेवकांची संख्यावाढ होणार आहे. बुधवारी याबाबत राज्य सरकारने याबाबत जाहिर केले आहे. मुंबई शहर विभागात ५६, पूर्व उपनगरात ६९ तर पश्चिम उपनरात १०२ प्रभाग असे मिळून २२७ प्रभाग आहेत. यात ९ प्रभाग वाढल्याने प्रभागांची संख्या आता २३६ होणार आहे.

१८७२ पासून वार्ड, नगरसेवक संख्येत वाढ-
मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी म्हणजे १८७२ मध्ये अगदी सुरुवातीला नगरसेवकांची संख्या फक्त ६४ एवढी होती. त्यानंतर आजपर्यंत चार वेळा वॉर्ड व नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली. आता पाचव्यांदा नगरसेवक व वॉर्डांच्या संख्येत वाढ होणार आहे. मुंबईत १८७२ ला नगरसेवकांची संख्या ६४ असताना १९६३ ला (एक सदस्य प्रभाग रचना अंमलात आली) थेट ७६ ने वाढ होऊन ती संख्या १४० वर गेली. त्यानंतर पुन्हा १९८२ मध्ये म्हणजे १९ वर्षांनी वार्ड व नगरसेवक संख्येत मोठा बदल झाला. त्यावेळी अस्तित्वात असलेली वार्ड, नगरसेवक संख्या आणखीन ३० ने वाढविण्यात येऊन ती थेट १७० वर गेली. तसेच, १९८३ च्या सुमारास नगरसेवकांचा निवृत्तीचा कालावधी १ वर्षाने वाढविण्यात आला होता. १९८२ नंतर आणखीन ९ वर्षांनी म्हणजे १९९१ च्या सुमारास पालिकेतील वार्ड व नगरसेवकांच्या संख्येत थेट ५१ ने वाढ करण्यात आली. त्यामुळे त्यावेळी वार्ड व नगरसेवक संख्या थेट २२१ वर पोहोचली. मात्र त्यानंतरही पुन्हा ११ वर्षांनी म्हणजे २००२ ला त्यात बदल करण्यात आला. वार्ड व नगरसेवकांची संख्या आणखीन ६ ने वाढवून २२७ वर नेण्यात आली. आता मुंबईतील वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या पाहता १९ वर्षानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील वॉर्ड व नगरसेवक संख्या आणखीन ९ ने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वॉर्ड व नगरसेवकांची संख्या थेट २३६ वर जाणार आहे.

या भागातील नगरसेवक वाढणार
- पवई, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड
- भांडूप-मुलुंड पश्चिम भाग
- विक्रोळी-कांजूरमार्ग पूर्व
- नाहूर, भांडूप पश्चिम
- अंधेरी पश्चिम
- गोरेगाव पश्चिम
- मालाड पश्चिम
- कांदिवली विभाग
- बोरिवली-दहिसर

२० वर्षांनी वाढणार सदस्य संख्या -
- १९६३ - १४०
- १९८२ - १७०
- १९९२ - २२१
- २००२ - २२७
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)