निर्बंध हटणार मात्र मास्कपासून सुटका नाही !

0


मुंबई - गेले जवळपास पावणेदोन वर्षे कोरोनाच्या भीतीमुळे बंधनात असलेले नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. राज्यातील सर्व गोष्टी पूर्वीसारख्याच सुरु करण्याबाबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य शासनाला कळवले असून मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील महिन्यापासून ही सूट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, सरसकट सूट दिली तरी मास्क वापरण्यापासून कोणतीही सूट देण्यात येणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव आणि प्रसार यामुळे संपूर्ण जगालाच अभूतपूर्व अशा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले होते. रुग्णसंख्या कमी होत असल्याचे पाहून राज्याने आणि केंद्रानेही वेळोवेळी काही प्रमाणात शिथिलता दिली होती, मात्र ती तात्कालिक ठरली होती. कोरोनाची पहिली लाट- दुसरी लाट, अशी तज्ज्ञांची भाकिते आणि त्यानंतर काही काळाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार पुन्हा बंधने आणत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर नोकरदारांनी वर्ष-दीड वर्षे घरात बसून काम केले. लॉकडॉऊन असला तरी अत्यावश्‍यक सेवांना बंधनातून वगळले होते. मुंबईतील लोकल प्रवास असो, किंवा कार्यालये उघडणे असो या सर्वांवर बंधने होती. आताही कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र अनेकांना अद्यापही लोकल प्रवासाची मुभा नाही.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा हिरवा कंदील - 
मात्र, आता लसीकरण बहुतांश प्रमाणात पूर्ण झाले आहे, तसेच रुग्णसंख्याही आटोक्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट सूट देण्यास हरकत नसावी, तसेच यावर राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, असा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला असून त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.या प्रस्तावानुसार सध्या लोकल प्रवास, बाहेर फिरणे, बाजारहाट, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बाग-बगीचे, व्यायामशाळा आदी ठिकाणी जाण्यावर घालण्यात आलेली बंधने हटविण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच मुक्त संचार करण्यात येणार आहे. सर्व व्यवहार पूर्ववत होऊन लोकांना दिलासा मिळावा, तसेच अर्थव्यवस्था रुळावर यावी यासाठी ही सूट देण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला असे अजूनही म्हणता येणार नाही, पण परिस्थिती आटोक्यात आहे. त्यामुळेच ही सर्व बंधने उठविण्यात येणार असली तरी मास्कपासून सुटका होणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

फेब्रुवारी-मार्चमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता - 
रशिया, जर्मनीसह विविध देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भारतात फेब्रुवारी- मार्चदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाचा संभाव्य उत्परिवर्तित विषाणू घातक नसेल तर तिसरी लाट फारशी तीव्र नसेल. देशातील नागरिकांमध्ये `डेल्टा`विरोधात बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून लसीकरणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तिसरी लाट सौम्य असेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)