
मुंबई: मुंबईतील घाटकोपर येथील पंतनगर परिसरात एका नाल्यात नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला कपड्यात गुंडाळून फेकून देण्यात आले होते. हे अर्भक नाल्या वाहून जात असताना आसपासच्या मांजरींनी पाहिलं. त्यानंतर मांजरींनी ओरडायला सुरुवात केली. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत या अर्भकाची जीव वाचवला.
नाल्यात अर्भक वाहत असल्याचं पाहून आसपासच्या मांजरींच्या ते लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. मांजरींचे ओरडणे काहीतरी वेगळं असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. मांजरींना काहीतरी सांगायचं आहे हे आसपासच्या रहिवाशांच्या लक्षात आलं. ज्या दिशेने मांजरी ओरडत आहेत त्या दिशेला पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण नाल्यात नुकतेच जन्मलेले अर्भक होते. ते कपड्यात गुंडाळलेले होते. त्यामुळे ते पाण्यावर तरंगत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवलं. पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
नाल्यातील अर्भकाला घेऊन पोलिसांनी राजावाडी रुग्णालय गाठलं. तिथं या नवजात अर्भकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अर्भकाची प्रकृती धोक्याची बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी या नवजात अर्भकासोबतचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेयरही केला. पोलिसांनी अर्भकाचा फोटो ट्विट करत लिहिलंय की, 'एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती. शेजारच्या मांजरींनी ओरडुन गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले.
या नवजात अर्भकाला नाल्यात कोणी सोडले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. किंवा या अर्भकाचे आई-वडील कोण आहेत हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखत अर्भकाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांचे कौतुक तर होत आहेच, मात्र ज्या मांजरींमुळे अर्भक असल्याचे दिसले त्या माजरींची देखील परिसरात चर्चा होत आहे.