मुंबईत दहा दिवसांत २४९ नवीन क्षय रुग्णांची नोंदमुंबई - मुंबईत कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात असले तरी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर पालिका अलर्ट झाली आहे. तर दुसरीकडे पालिकेने इतर आजारांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पालिकेकडून राबवण्यात आलेल्या क्षय सर्वेक्षणात २४९ नवीन क्षय रुग्ण सापडले आहेत.

पालिकेने मुंबईतील २४ क्षयरोग जिल्ह्यांतील ५४ टीबी युनिट परिसरांमधील एकूण १७ लाख ७ हजार ४२ नागरिकांची तपासणी केली. त्यात ११ हजार ४१६ संशयित क्षयरुग्ण सापडले होते. पालिकेने केलेल्या तपासणीत २४९ नागरिकांना क्षयाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यापैकी २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्यांत नोव्हेंबरमध्ये दहा दिवसांत पालिकेच्या आरोग्य विभागाने सुमारे १७ लाख नागरिकांची तपासणी केली. दिवसभर सर्वेक्षण करण्यात आले. १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान स्पेशल सक्रिय रुग्ण शोधमोहीम असे वर्षाचे पहिले विशेष क्षयरोग तपासणी अभियान महापालिकेने राबवले. क्षयरोगाची बाधा झालेल्यांनी नियमित औषधोपचाराचा कोर्स पूर्ण केल्यास तो बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तातडीने महापालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातून क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी. ती पूर्णपणे मोफत आहे. कुटुंबामध्ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा असल्याचा इतिहास आहे किंवा ज्यांना यापूर्वी त्याची बाधा झाली आहे, अशा व्यक्तींनी लक्षणांबाबत अधिक जागरूक असणे गरजेचे आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post