राज्यात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण, रुग्णसंख्या १७ वर

Anonymous
0


मुंबई - राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १० रुग्ण आढळून आले होते. यानंतर आज मुंबईत ३ तर पिंपिरी चिंचवडमध्ये ४ असे ७ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. 

राज्यात अति जोखमीच्या देशातून ९६७८ तर इतर देशातून ५१ हजार ७६१ असे एकूण ६१ हजार ४३९ प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील ९६७८ तर इतर देशातील १२४९ अशा एकूण १० हजार ९२७ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले २० तर इतर देशातून आलेले ५ अशा एकूण २५ प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १७ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. १ नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व पॉजिटिव्ह  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८९ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ४७ जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)