टांझानियातून धारावीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Anonymous
0


मुंबई - जगभरात चिंता वाढवणारा घातक ओमायक्रोन हा कोरोनाचा नवा व्हेरियंटचा पहिला रुग्ण महामुंबईत सापडल्याने चिंता वाढली आहे. त्यात आता धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. या रुग्णाची जिनोम सिक्वेनसिंग चाचणी केली जात आहे. त्यामुळे चाचणीच्या अहवालानंतर त्याला ओमायक्रोनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे. या रुग्णावर पालिकेच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या रुग्णाच्य़ा संपर्कात आलेल्या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अहवाल अजून यायचा आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

ओमाय क्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत २७९४ परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी डोंबिवली येथील एका प्रवाशाला ओमायक्रोनची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर टांझानिया येथून धारावीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चाचणीच्या अहवालानंतर त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आशियातील सर्वात मोठ्या झोपड़पट्टी असलेल्या धारावीत संसर्ग झपाट्याने पसरल्याने संपूर्ण देशाची चिंता वाढली होती. विस्तीर्ण दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. संपूर्ण यंत्रणा धारावीत दिवसरात्र कामाला लागली. राज्य व पालिकेच्या प्रभावी उपाय़योजनामुळे येथील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास पालिकेला यश आले. दुस-या लाटेतही कोरोनाला रोखण्यासाठी पालिका यशस्वी ठरली. दरम्यान निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने धारावी व परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने धारावी पूर्वीप्रमाणे गजबजू लागली. मात्र ओमायक्रॉनची चिंता वाढली असताना टांझानियामधून धारावीत आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्य़ाने मुंबईकरांची चिंतेत वाढ झाली आहे. धारावी ही दाटीवाटीने वसलेली सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याने वेगाने संसर्ग पसरण्याची भिती असल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. हा रुग्ण कोरोना ओमियाक्रॉनचा संसर्गित आहे का हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून अहवालानंतरच समजू शकणार आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

परदेशी प्रवाशांच्या चाचण्या वाढवल्या -
दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई विमानतळावर नोव्हेंबरपासून आलेल्या आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या विभागवार असलेल्या वॉर रूममधून या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत असून जे रुग्ण पोजिटिव्ह आढळून येत आहेत त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांची जिनोम सिक्वेनसिंग व एस जिन चाचण्या केल्या जात आहेत.

१३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह -
१० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान हायरिस्क देशातून ३७६० प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी २७९४ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात १२ पुरुष तर १ महिला प्रवासी आहे. या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

धारावीतील शौचालयांचे सॅनिटायझेन -
ओमायक्रॉनची चिंता असतानाच धारावीत टांझानियातून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. संसर्ग पसरू नये यासाठी धारावीतील सर्व शौचालय सॅनिटायझर केले जात आहेत. इतरही आवश्यक खबरदारी घेतली जात असून या दृष्टीने प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)