राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना करोनाची लागण

JPN NEWS
0


मुंबई - मंगळवारी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले. यामध्ये जेजे रुग्णालयातील ५१, लो. टिळक रुग्णालयामध्ये ३५, केईएममध्ये ४०, नायरमध्ये ३५ निवासी डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे महाराष्ट्र राज्याच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. राज्यातील सार्वजनिक व पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांमध्ये करोना संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

नीट पीजी प्रवेश प्रक्रियेला होणाऱ्या दिरंगाईबद्दल राज्यातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. आपत्कालीन व करोना रुग्णांना हे डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहे. मागील दोन्ही लाटांमध्ये करोना संसर्गाची लागण अनेक डॉक्टरांना झाली होती. आता या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असल्यामुळे डॉक्टरांनाही करोनाची लागण वेगाने होत आहे. विद्यार्थ्यांमधील लक्षणे तीव्र स्वरूपाची नसून वसतिगृहामधील खोल्यांमध्ये अनेकजण विलगीकरणामध्ये आहेत. मनुष्यबळाची अडचण सोडवण्यासाठी सरकारने तातडीने ही निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर विचार करावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

वसतिगृहामध्ये मुक्काम नको -
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर हे वसतिगृहामध्ये राहतात. त्यांचे राहते घर मुंबईत नसते. त्यामुळे बाधित असलेल्या निवासी डॉक्टरांना वसतिगृहामधील खोल्यामध्ये विलगीकरणात राहावे लागते. या निवासाची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रुग्णालयातील जागा वाढल्या असल्या तरीही निवासाच्या सुविधा अद्ययावत झालेल्या नाहीत. दोन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी राहावे लागू नये, तसेच संसर्गामुळे वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉक्टरांचे आरोग्य जपायचे असेल तर त्यांच्यासाठीही सुरक्षित अंतराचा नियम वसतिगृहामध्येही पाळायला हवा, असा आग्रह निवासी डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)