Type Here to Get Search Results !

मुंबईत कोविड लसीकरणाने ओलांडला दोन कोटी डोसचा टप्पा !मुंबई - ।कोविड - १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून २ कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीत मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा तसेच आदी यंत्रणांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

मुंबईसह देशभरात दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड - १९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचा-यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचा-यांसाठी, ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले. नुकतेच ३ जानेवारी २०२२ पासून वयवर्ष १५ ते १८ वयोगटातील नवयुवकांचे देखील लसीकरण सुरु झाले आहे.
              
लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. पहिली आणि दुसरी मात्रा यांचा एकत्रित विचार करता, ५ मे २०२१ रोजी २५ लाख, २६ जून रोजी ५० लाख,  ७ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ लाख,  ४ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला. त्यानंतर, २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख, १० नोव्हेंबर २०२१ रोजी १ कोटी ५० लाख, २९ डिसेंबर २०२१ रोजी १ कोटी ७५ लाख लसीकरण पूर्ण झाले. बुधवारी, २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ कोटी कोविड लस मात्रांचा टप्पा गाठण्यात आला. यामध्ये १ कोटी ५ लाख ८५ हजार ५८० पहिल्या मात्रा, ९० लाख ९२ हजार ११८ दुसरी मात्रा तर ३ लाख २९ हजार ४७८ प्रतिबंधात्मक मात्रा समाविष्ट आहेत.  

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरी मात्रा देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad