आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे - प्रकाश आंबेडकर

0


मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून ते आता गंभीर वळणावर पोहचले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरोप-प्रत्यारोपांवर मौन सोडावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय पक्षात आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. हे आता गंभीर वळणावर येऊन पोहचले आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आता मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप-प्रत्यारोप राहिले नसून अनेक हत्यांचे आरोप होत आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राज्यातील शिवसेना, भाजपमधील आरोप- प्रत्यारोपातील राजकारण शिगेला पोहचल्याची गंभीर बाब असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव -
महापालिका निवडणुकींसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र आघाडी करण्याचा हा प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा असून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्त्वाकडे दिला आहे. मात्र, काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)