Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

Ebola - इबोला विषाणू सर्वाधिक प्राणघातक !न्यूयॉर्क / मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आता कोरोनापाठोपाठ इबोला विषाणूबद्दल देखील एक माहिती समोर आली आहे. जी धक्कादायक आहे. पूर्वी हा विषाणू जितका धोकादायक मानला जात होता, त्यापेक्षा तो अधिक भयावह आहे. नवीन संशोधनानुसार, इबोला विषाणू मानवाच्या मेंदूमध्ये वर्षानुवर्षे लपून राहू शकतो आणि तो माणसाचा जीवही घेऊ शकतो. (Ebola Dangerous)

नदीवरून इबोला नामकरण -
अमेरिकन लष्कराने आपल्या ताज्या संशोधनात हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की इबोला संसर्गानंतरही सर्व काही ठीक असले तरी मेंदूमध्ये दडलेला इबोला विषाणू वर्षभरानंतरही आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात करू शकतो. मेंदूच्या आतमध्ये असताना तो नवीन संसर्गाचे कारण बनू शकतो. संशोधकांनी माकडांवर संशोधन केल्यानंतर ही माहिती शेअर केली आहे. इबोला विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. १९७६ या विषाणूचा शोध लागला. सुदान आणि काँगो या आफ्रिकी देशांमध्ये तो मोठ्या प्रमाणात फैलावला. काँगोतील इबोला या नदीवरून त्याचे नामकरण करण्यात आले.

संसर्ग कसा होतो?
इबोला संसर्ग जनावरांपासून वा या विषाणूची लागण झालेल्या लोकांकडून होतो. अलीकडेच सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन जर्नलमध्ये इबोलाविषयी एक नवे संशोधन प्रकाशित झाले. इबोला कैक वर्षे माणसाच्या मेंदूत लपून राहू शकतो आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर शरीरावर हल्ला करू शकतो, असे या संशोधनात स्पष्ट झाले.

लक्षणे काय आहेत?
इबोलाची लागण झाल्यास मेंदूला सूज येते. तसेच सणकून ताप येतो. इबोला केवळ मेंदूतच नव्हे तर डोळ्यांच्या पेशींमध्येही लपून राहू शकतो. २०२१ मध्ये इबोलाचा तीन वेळा फैलाव झाला होता. हा एक घातक विषाणू असून त्याचा अटकाव हे जागतिक आव्हान असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.

रुग्णांमध्ये ५० टक्के मृत्यूचे प्रमाण
इबोला विषाणूतून बरे होणा-या रुग्णांमध्ये वारंवार होणा-या संसर्गाबाबत हे संशोधन करण्यात आले आहे. इबोला विषाणूची लागण झालेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो किंवा ही संख्या त्याहूनही जास्त असू शकते. आतापर्यंत, त्याच्या संसर्गाची बहुतेक प्रकरणे उप-सहारा आफ्रिकेत आढळली आहेत. २०२१ मध्ये गिनीमध्ये इबोला विषाणूचा प्रसार झाला. त्याच्या सुरुवातीचे कारण अशी व्यक्ती होती, ज्याच्या शरीरात इबोला विषाणू ५ वर्षापर्यंत जिवंत होता.

मेंदूच्या व्हेंट्रिक्युलर सिस्टिममध्ये लपतो 
या संशोधनात सहभागी संशोधक केविंग झेंग यांच्या म्हणण्यानुसार, इबोलाचा विषाणू मेंदूमध्ये कुठे लपून राहू शकतो यावर संशोधन करण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले आहे की इबोला संसर्गातून बरे झाल्यानंतर, प्रत्येक ५ पैकी १ माकडामध्ये विषाणूचे अंश आढळून आले. हा विषाणू मेंदूच्या वेंट्रिक्युलर सिस्टिममध्ये लपून राहू शकतो. इतकेच नाही तर संशोधनादरम्यान इबोलाच्या संसर्गामुळे २ माकडांचा दीर्घकाळानंतर मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या माकडांमध्ये इबोलाचा अंश आढळून आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom