मंगलप्रभात लोढांनी घेतली राज ठाकरेंची भेट

0


मुंबई - मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोढा व राज ठाकरे यांची भेट झाली अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप- मनसे युतीबाबत चर्चा झालेली नाही. ही राजकीय भेट नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्य़ा पार्श्वभूमीवर भाजप, मनसे युती करणार अशी चर्चा रंगली होती. याआधी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मनसेच्या भूमिकेवर आणि मुद्द्यांवरही चर्चा झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना आपल्या घरी येण्याचेही निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा मान राखत काही दिवसांनी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी युतीबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नव्हती. तसेच ही राजकीय भेट नव्हती असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

रविवारी मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरे यांची भेट झाली. आगामी मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशातच मनसे आणि भाजपमध्ये युती होईल असे अंदाज वर्तवण्यात येत होते. मात्र मनसे आणि भाजपमध्ये कोणतीही युती होणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)