Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राचा अवमान, पंतप्रधान मोदींनी माफी मागावी - नाना पटोले



मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रति थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या सर्व नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचा असतो याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत.   

संकटात, अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याचा मानवधर्म आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडी सरकारने निभावला. उपासमारीची वेळ आलेल्या परप्रांतीय बांधवांच्या जेवणाची व्यवस्था  केली आणि त्यांचे तिकीट काढून त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित व सन्मानाने पोहोचवले. जेव्हा हे मजूर अडचणीत होते तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी पंतप्रधान लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगत होते आणि आपल्या निवासस्थानी मोरांना दाणे खाऊ घालण्यात व्यस्त होते. त्यांना सर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्या उद्योगपती मित्रांची जास्त काळजी आहे. संपूर्ण कोरोना काळात जनतेला मरायला सोडून मोदी आपल्या उद्योगपती मित्रांना देशाची संपत्ती वाटत होते. कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातील नमस्ते ट्रम्प सारखे कार्यक्रम करून देशात कोरोनाचा प्रसार करणारे नरेंद्र मोदीच कोरोनाचे खरे स्प्रेडर आहेत. मोदीजी ज्यांच्यावर आरोप करत आहेत ते परप्रांतीय मजूर बांधव तर कोरोना वॉरियर आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom