मेडिकल स्टाफ हे ईश्वरी रुपचं - आदित्य ठाकरे

0


मुंबई - कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी कोरोना किती घातक आहे याबद्दल कोणालाच अनुभव नव्हता. परंतु मुंबई महापालिकेसह राज्यातील रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, मेडिकल स्टाफ आदींनी जीवाची बाजी लावत रुग्ण सेवा केली. त्यामुळे कोविड काळात डॉक्टर्स परिचारिका मेडिकल स्टाफ हे ईश्वरी रुपचं आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. सायन रुग्णालयातील वसतिगृहाचे लोकार्पण व प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

रुग्णालयाची स्थापना १९४७ साली झाल्यानंतर, ३० नोव्हेंबर १९६४ ला या रूग्णालयाला संलग्न असे लोकमान्य टिळक वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षी ६० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयातून सध्या दरवर्षी जवळपास २०० विद्यार्थ्याना एम.बी.बी.एस पदवी दिली जाते व १५० विद्यार्थ्यांना विवीध पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. परिचर्या विद्यालय, भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार डीएमएलटी अभ्यासक्रमही उपलब्ध झाले आहे. रविवारी सायन रुग्णालयातील वसतिगृहाचे लोकार्पण व प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. शहर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वस्त्रोद्योग व मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. तर रूग्णालयाला ७५ वर्षे झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या एका विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार तमिल सेल्वन, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉक्टर नीलम आंद्रादे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी, यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णशय्यांची क्षमता वाढवणार -
परिचारिका महाविद्यालय व निवासी वैद्यकीय कर्मचारी इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. विस्तारित वसतिगृह इमारतीचे काम पूर्ण झाले असून तिचे लोकार्पण करण्यात आले आहे. पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह व वैद्यकीय अधिकारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. अस्तित्‍वात असलेल्‍या रुग्‍णालयातील रुग्णशय्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे तसेच विशेष रुग्‍णशय्या व मल्‍टीस्‍पेशालिटी रुग्‍णशय्यांची व्‍यवस्‍था करून अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

आणिबाणीच्या स्थितीत अधिकारी वेळीच उपलब्ध होणार!
वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी रुग्णालयाच्या जवळच्या परिसरात निवासस्थान बांधल्यामुळे आणिबाणीच्या परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाच्या जवळच्या परिसरात राहिल्यामुळे अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सहज उपलब्ध होतील व त्यामुळे रुग्णालयाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल व नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देता येतील.

५ टप्प्यात पुनर्विकास होणार!
कंत्राट किंमत : रु. ६१६.६२ कोटी
बांधकामाचे क्षेत्रफळ: १३.८१ लाख चौ.फुट
कालावधी : ६० महिने असून सदर कामे ४८ महिन्यातच पूर्ण करण्याचा मानस आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)