Type Here to Get Search Results !

रस्ते पदपथांवर डेब्रिज टाकणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार करा - पालिका आयुक्तांचे निर्देशमुंबई - मुंबईकरांना विविध सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे उपयोगितांसाठी रस्ते-पदपथ खोदले जातात. या ठिकाणचे डेब्रिज वेळच्या वेळी न हटविल्यास विविध ठिकाणी पाणी तुंबू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळच्या वेळी डेब्रिज न हटविणा-या संस्थांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचे तसेच पावसाळा विषयक कामांची नियमित पडताळणी करण्याचे आणि 'मॅन होल' तपासणी नियमितपणे करण्याचेही निर्देश महानगरपालिकेचे प्रशासक डाॅ. इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित सह आयुक्त व उपायुक्तांना आज दिले.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डाॅ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने एका विशेष बैठकीचे आयोजन आज महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते‌. यावेळी बोलताना बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'मॅन होल' व संरक्षक जाळ्या याबाबत नियमितपणे पाहणी व पडताळणी करून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर कार्यवाही करावी. रस्त्यांची सुरू असलेली कामे ही येत्या १५ मे पर्यंत निर्धारित वेळापत्रकानुसार पावसाळ्यापूर्वी करावीत. पालिकेच्या उद्यान खात्याने पावसाळा पूर्वतयारीचा भाग म्हणून त्यांच्या अखत्यारीतील झाडांची छाटणी वेळच्या वेळी व शास्त्रोक्त पद्धतीने करावी. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणाबाबत निर्धारित करण्यात आलेल्या बाबींची तातडीने कार्यवाही करावी. विद्युत पुरवठ्याबाबत 'बेस्ट' उपक्रमासह सर्व संबंधित वीज पुरवठादार कंपन्यांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या बाबींच्या अनुषंगाने सजग व तत्पर राहावे. पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने भारतीय नौदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल यांना आवश्यक त्या सर्व तयारीसह मदतीसाठी तैनात राहावे. साथ रोगांच्या प्रादुर्भावाची शक्‍यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आवश्यक त्या सर्व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहावे असे निर्देश आयुक्तांनी दिले.

'मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित' व 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (MMRDA) यांच्याद्वारे विविध कामे सुरु आहेत. या अनुषंगाने येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्तरावर समन्वय साधावा. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवर पाणी साचू नये किंवा खड्डे पडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश. तसेच या दोन्ही महामार्गांलगत असणाऱ्या 'कल्व्हर्ट'ची योग्यप्रकारे साफसफाई करण्याचे निर्देश देण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित हवामान विषयक माहिती निश्चित कार्यपद्धतीनुसार वेळच्यावेळी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याला देण्याचे निर्देश बैठकीदरम्यान संबंधितांना देण्यात आले.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad