वगसम्राट दादू इंदुरीकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुरस्कार सुरू करा

0


मुंबई-१९- ( प्रतिनिधी ) : संगीत कला अकादमीच्या राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित तसेच लोकप्रिय वगनाट्य " गाढवाचे लग्न " फेम वगसम्राट दादू राघु सरोदे-इंदुरीकर यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या स्मारकास पुणे जिल्ह्यातील त्यांचे मुळ गाव इंदुरी किंवा तळेगाव दाभाडे येथे जागा दयावी, दादू ईंदूरीकर यांच्या नावे 10 लाखांचा पुरस्कार सुरू करावा अशा मागण्या वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे संस्थापक सरचिटणीस अशोक सरोदे ईंदूरीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केल्या आहेत.

गाढवाचे लग्न लोकनाट्य फेम वगसम्राट दादू इंदुरीकर यांनी आपले जीवन तमाशा व लोकसेवेसाठी अर्पण केले. ते प्रतिभावंत कलावंत होते. त्यांच्या लोकनाट्याचे देशात विदेशात एक हजारापेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना संगीत कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या शुभहस्ते सन १९७३ साली देऊन सन्मानींत केले होते. गाढवाचे लग्न या वगनाट्याचा दि. ४ सप्टेंबर १९७० रोजी मुंबईत रविंद्र नाट्य मंदिरातील २१व्या प्रयोगास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

१३ जून १९८० रोजी दादूचे निधन झाल्यानंतर त्यांची कला व स्मृतीजतन रहावी म्हणून त्याचे पुत्र दिवंगत गणेश दादू सरोदे इंदुरीकर यांनी वगसम्राट दादू ईंदूरीकर प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. त्याच्या स्मारकास जागा मिळावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अनुकुलता दर्शवून तसे पत्र संबंधित महसूल मंत्री व प्रशासनास दिले होते. त्यानंतर वारंवार शासनाकडे मागणी करून सुद्धा अजूनही स्मारकास जागा मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने त्याच्या स्मारकाकरिता सवलतीच्या दरात किमान ४ ते ६ एकर जागा प्रतिष्ठानला त्यांचे मूळ गाव इंदुरी किंवा तळेगाव दाभाडे येथे उपलब्ध करून दयावी, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

या मागण्या बरोबर प्रतिष्ठानला मुख्यमंत्री सहाय्य मदत मिळावी, इंदुरी गावाबाहेरील जागेवर त्यांच्या पूर्णकृती पुतळा उभारावा, त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यावा, दरवर्षी त्यांच्या नावे तमाशा लोककलावंताना १० लाखाचा वगसम्राट दादू इंदुरीकर जीवनगौरव पुरस्कार दयावा, तळेगाव इंदुरी चाकण या महामार्गास वगसम्राट दादू राघू सरोदे इंदुरीकर महामार्ग असे नामकरण करावे, १३ जून २०२२ या त्यांच्या स्मृतीदिनी "गाढवांचे लग्न" या वगनाट्याचे आकाशवाणी व दूरदर्शनवर पूर्व प्रसिद्धीसह पुनर्प्रक्षेपण करण्यात यावे, राज्य शासनाच्या सहा महसूल विभागामध्ये त्यांच्या जीवनपर कार्यक्रम राबवावे, तमाशा लोककलावंतांना सांस्कृतिक विभागाच्या समितीवर प्रतिष्ठानचा अथवा त्यांनी सुचविलेल्या एक प्रतिनिधीचा नियुक्ती करावा, अशा मागण्या लेखी निवेदनाद्वारे अशोक सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)