Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही - चंद्रकांतदादा पाटीलमुंबई - मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवार दि. २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. पण राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने तीनशे कोटींची मालमत्ता बळकावली व ती तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांच्या कंपनीच्या मालकीची असल्याचे दाखविले. दाऊदसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने नवाब मलिक यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून अधिक तपासासाठी मलिक यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिमोट कंट्रोलने महाविकास आघाडी सरकार चालविणारे शरद पवार हे तातडीने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मलिक यांच्या राजीनाम्यास नकार देऊन मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले हे धक्कादायक आहे.

ते म्हणाले की, १९९२ व १९९३ च्या मुंबईतील दंगल व बॉम्बस्फोटाच्या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी प्रखर भूमिका घेतली होती. आज त्याचे चिरंजीव मुख्यमंत्री असताना मात्र त्या बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांना साथ देणाऱ्या मंत्र्याची पाठराखण करतात हे धक्कादायक आहे. ही त्यांची राजकीय तडजोड असली तरी आम्ही ते सहन करणार नाही. उद्यापर्यंत नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आला नाही तर भाजपा विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही. आम्ही सतत आवाज उठवू. नवाब मलिक यांचा राजीनामा होईपर्यंत भाजपाचे आंदोलन चालू राहील.

त्यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने शिक्षण व रोजगाराच्या अनेक योजना सुरू केल्या. त्या महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या. त्या पुन्हा चालू होण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण केले, त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. सहज होण्यासारख्या कामांसाठी छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले. आता सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे खरंच कारवाई होईल यासाठी राजेंनी पाठपुरावा करावा नाही तर तोंडाला पाने पुसल्यासारखे होईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजपाही राजेंच्या साथीने पाठपुरावा करेल, असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आलेले भरमसाठ वीजबिल आणि त्यांचे वीज कनेक्शन कापणे या मुद्द्यांवर भाजपाने यापूर्वी राज्यव्यापी आंदोलन केले आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपाचा राजू शेट्टी यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे. गरज पडल्यास भाजपा आंदोलनात सक्रीय सहभागी होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom