पाणी कपात - काँग्रेस पालिका कार्यालयांवर मोर्चा काढणार

0

मुंबई - मुंबईत माटुंगा एफ नॉर्थ विभागासह अनेक विभागात पाण्याची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणी मिळत नसल्याने मुंबईकर त्रस्त आहेत. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पालिकेच्या एफ नॉर्थ कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. एफ नॉर्थ प्रमाणेच ज्या ज्या विभागात पाणी समस्या आहे त्या विभागातही काँग्रेकडून मोर्चा काढला जाईल अशी माहिती माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने १५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती. मात्र त्या दरम्यान मुंबईमध्ये ६० टक्के पाणी कपात होती. ४० टक्केच पाणी नागरिकांना मिळत होते. आता पालिकेने कपात रद्द केल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही माझ्या माटुंगा येथील एफ नॉर्थ विभागात ७५ टक्के पाणी कपात आहे. नागरिकांना २५ टक्केच पाणी मिळत आहे. याबाबत पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे. वॉर्डमधील अधिकाऱ्यांनाही पाण्याची समस्या सांगितली. तरीही पाणी कपात सुरूच आहे. यामुळे पलिकेला ३ दिवसांचा वेळ देत आहे. या तीन दिवसात पालिकेने पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी अन्यथा एफ नॉर्थ विभाग कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढला जाईल असा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.  

मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थ कार्यालयाप्रमाणेच पी साऊथ, सी, के वेस्ट आदी विभागात पाणी कपात आहे. इतरही विभागांची माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती गोळा करून ज्या विभागात पाणी कपात आहे त्या त्या विभागात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला जाईल अशी माहिती रवी राजा यांनी दिली. पालिकेच्या जल विभागाने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)