Type Here to Get Search Results !

३ लाखांची लाच घेताना पालिका अधिकाऱ्याला रंगेहात अटकमुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व कार्यालयात असलेल्या भाडे संकलक व त्यांच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीची दुकाने पालिकेकडे एनेक्चर -२ नोंद करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली. हि लाच घेताना पालिकेच्या भाडे  संकलक व त्याच्या सहकाऱ्याला लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. पालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यातच आता पालिका अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने पालिका प्रशासनाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. 

एका व्यक्तीच्या राहत्या घरास लागुनच पुढील बाजुस त्याचे दुकान आहे. त्याचे घर त्यांची पत्नीचे नावे असुन दुकान हे त्याच्या नावे आहे. सदर दुकान हे सन १९८५ मध्ये एसआरए मधुन रितसर फी भरून तक्रारदाराने स्वतःच्या नावे कमर्शिअल करून घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सन २०२० मध्ये मुंबई महानगनपालिकामधुन एनेक्चर -२ काढले, त्यामध्ये तक्रारदार यांना त्यांच्या दुकानाची नोंद दिसुन आली नाही. तसेच तक्रारदार यांची पत्नी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या सागबाग स्नेहनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परि -२ मध्ये नाव समाविष्ट करणेसाठी प्रकल्प अधिकारी (वसाहत) के / पूर्व, बीएमसी यांचे कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीअंती तक्रारदार यांच्या पत्नी यांचे अपील हे अमान्य करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी दुकाना संदर्भात एसआरए योजनेत व्यवसायीक दुकानाची नोंद पुर्ववत करण्याकरिता दुकानाची कागदपत्रे जोडुन दिनांक ०६/०१/२०२२ रोजी अंधेरी के / पूर्व विभाग, बीएमसी येथे अर्ज केला होता. 

लाच घेताना रंगेहात अटक - 
राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाबाबत ऑर्डर बदलुन देणेकरीता व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून पुर्ववत करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी लेखी तकार दिली.  २१ फेब्रुवारी २०२२ रोजी केलेल्या पडताळणीत राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना पत्नीच्या घरासंदर्भातील ऑर्डर बदलुन देण्यासाठी व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद पुर्ववत करण्यासाठी तक्रारदाराकडे ३ लाख रुपये  लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने ४ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान नाईक व त्यांचे सहकारी मोहन रावजी या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. नाईक व रावजी यांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई दरम्यान नाईक यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता, लाचेच्या रक्कमेव्यतिरिक्त आणखी ३ लाख रुपये रोख रक्कम मिळून आलेली असून सदर रक्कम पुढिल तपासकामी जप्त करण्यात आली असल्याची माहिती लाच लुचपत विभागाकडून देण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad