आठ दिवसानंतर आढावा घेऊन कोविड सेंटर बंद करणार

0


मुंबई - मुंबईत डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली होती. ही लाट ओसरल्याने मुंबईसह राज्यातील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.  मास्क लावण्याची सक्ती नसल्याने  स्वरक्षणासाठी किती जण मास्कचा वापर करतात, या कालावधीत रुग्ण वाढतात का याचा आढावा पुढील ८ दिवस घेतला जाईल, त्यानंतर जंबो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले आहे. २१ डिसेंबरपासून मुंबईत तिसरी लाट सुरू झाली. जानेवारीत रोज आढळून येणारी रुग्णसंख्या २१ हजारावर पोहचली. रोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली. परंतु योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे तिसरी लाट ही परतवण्यात पालिकेला यश आले. सध्यस्थितीत रुग्ण संख्या ५० च्या आत आढळत असून मृत्यू दर रोखण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबई प्रमाणे राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने  राज्य निर्बंध मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता मास्क लावणे ऐच्छिक करण्यात आले आहे. मास्कमुक्तीनंतर पहिल्या एक दोन दिवस लोकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून आले ही चांगली गोष्ट आहे. तरीही पुढील आठ दिवस रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणार असून रुग्ण संख्येत घट सुरुच राहिली तर १० जंबो  कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे काकाणी यांनी सांगितले. 

मुंबईत एकूण १० जंबो कोविड सेंटर असून सध्या वरळी येथील डोम, भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास व बीकेसी जंबो कोविड सेंटर अशी ३ सेंटर सुरु ठेवण्यात आली आहेत. या तीनही सेंटरमध्ये एक दोन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांत रुग्ण संख्या नियंत्रणात राहिली तर सगळेच जंबो कोविड सेंटर बंद करण्यात येतील, असे ही ते म्हणाले. दरम्यान, जम्बो कोविड सेंटर बंद केल्यानंतर तेथील साहित्य पालिकेच्या अन्य रुग्णालयात वापरण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)