Corona - वाढणा-या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची गरज - पंतप्रधान

0


नवी दिल्ली - सर्व पात्र मुलांचे लसीकरण लवकरात लवकर करणे हे सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवावे लागतील. तसेच साथीच्या रोगाशी संबंधित आव्हान अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे सर्व अधिका-यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. देशातील काही भागांमध्ये वाढणा-या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

देशातील ९६ टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड लसीचा किमान एक डोस मिळाला आहे असे म्हणत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. तर १५ वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी ८५ टक्के लोकांना कोविड-१९ लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा सांगत, मोदींनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये समान मनुष्यबळ वाढविण्याचे आवाहन केले.

काही राज्यांत रुग्णसंख्या वाढतेय
कोविड संकटाचे व्यवस्थापन करूनही, इतर देशांच्या तुलनेत, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ मंडळींकडून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, त्यांच्या सूचनांवर आपल्याला काम करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणेदेखील आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)