Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबईतील स्मशानभूमीत लाकडांऐवजी आता ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर


मुंबई - मुंबईमधील स्मशानभूमीत मृतदेह दहन करण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. मुंबईला दरवर्षी १८ लाख ६० हजार किलो लाकूड लागते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्मशानभूमीमध्ये लाकडा ऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’ (Biomass briquettes) वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार केले जाते. लवकरच याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर -
मुंबईतील पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे लाकूड साधारणपणे दोन झाडांपासून मिळते. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. या चाचपणीनंतर ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या १४ पारंपरिक स्मशानभूमींमध्ये पर्यावरण पुरकतेचा भाग म्हणून लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गोमारे यांनी सांगितले.

काय आहे ‘ब्रिकेट्स बायोमास’ -
‘ब्रिकेट्स बायोमास’ हे इंधन ‘शेती कचरा व वृक्ष कचरा यापासून तयार करण्यात येते. शेती कच-यातील जो ‘एक तृतीयांश’ भाग फेकून देण्यात येतो, त्यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार करण्यात येतात. यामुळे सदर कच-याचा अधिक चांगला उपयोग करण्याबरोबरच पर्यावरण-पूरकता देखील जपली जाते. पालिकेच्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० इतक्या मृतदेहांवर अंतीम संस्कार केले जातात. त्यानुसार या ठिकाणी मृतदेह दहनासाठी वर्षभरात सुमारे १८ लाख ६० हजार किलो एवढ्या प्रमाणात लाकडांचा वापर होतो. प्रत्येक मृतदेह दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. मात्र, लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’ मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom