५०० च्या बोगस नोटांत तब्बल १०१ टक्के वाढ !

0


नवी दिल्ली - देशात बोगस नोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आरबीआयच्या अहवालातून याबद्दलची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून २०२१-२२ मध्ये बोगस नोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण तब्बल १०१.९ टक्क्यांनी वाढले. यासोबतच २००० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाणही ५४.१६ टक्क्यांनी वाढले आहे.

३१ मार्च २०२२ पर्यंत बाजारात असलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ८७.१ टक्के होते. ३१ मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण ८५.७ टक्के इतके होते. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५०० रुपयांचे प्रमाण सर्वाधिक होते. हे प्रमाण ३४.९ टक्के होते. यानंतर १० रुपयांच्या नोटेचा नंबर लागतो. बाजारात असलेल्या एकूण चलनांत १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २१.३ टक्के आहे.

चलनात असलेल्या बोगस नोटांचे प्रमाण वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आरबीआयच्या अहवालानंतर मोदी सरकारला लक्ष्य केले. भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला हेच नोटबंदीचे एकमेव दुर्दैवी यश, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले.

नोटाबंदीतून काय साध्य केले?
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनीदेखील बोगस नोटांच्या वाढलेल्या संख्येवरून मोदींना लक्ष्य केले आहे. नमस्कार मिस्टर पीएम मोदी. नोटबंदी? आठवतेय का? ममता बॅनर्जींवर केलेली टीका आठवतेय का? नोटबंदीमुळे बोगस नोटांचा प्रश्न संपेल, असे वचन तुम्ही देशवासीयांना दिले होते. आरबीआयचा नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल पाहा. बोगस नोटांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे, असा खोचक टोला ओब्रायन यांनी मोदी सरकारला लगावला.

गतवर्षीच्या तुलनेत वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत १०, २०, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नकली नोटांचे प्रमाण अनुक्रमे १६.४ टक्के, १६.५ टक्के, ११.७ टक्के, १०१.९ टक्के आणि ५४.६ टक्के इतके वाढले आहे, तर ५० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण २८.७ टक्क्यांनी, तर १०० रुपयांच्या बोगस नोटा १६.७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)